मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

ज्योतिर्लिंगे
अनेक धर्म व अनेक देवदेवता असणार्‍या भारत देशात अनेक देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवांच्या भारतातील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंगे आहेत. त्यांची माहिती पुढे दिली आहे.

१. त्र्यंबकेश्वर -
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.

या ठिकाणी भाविकांसाठी निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. इथला परिसर निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही अनुभव येतो. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.
२. औंढा नागनाथ -
पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांचीदेखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते.

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ तालुक्यात हे स्थान आहे.
३. घृष्णेश्वर -
बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले.

घृष्णेश्र्वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. भाविक लोक दर्शनासाठी आल्यानंतर जगप्रसिद्ध असणार्‍या वेरूळच्या लेणी पाहिल्याशिवाय परत जात नाहीत.

या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेषदेखील (जुना वाडा) मंदिराजवळ आहेत. औरंगाबादपासून ३० कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे.
४. भीमाशंकर -
भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.

भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे.

हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.

राजगुरूनगरपासून भीमाशंकर अवघ्या ९५ कि. मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. अंतरावर आहे. भीमाशंकर हे आंबेगांव आणि राजगुरूनगर तालुक्यात विभागले गेले आहे. भीमा नदीचा उगम हा राजगुरूनगर  तालुक्यात झालेला आहे. तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी जास्त संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
५. परळी वैजनाथ -
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर हे ठकाण आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात असून येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा