मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

देवीची साडेतीन शक्तिपीठे

१. सप्तशृंगगड (वणी) -
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे.  या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.

सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.

सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे.

नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात.

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

२. माहूर - (देवी रेणुकामाता)-
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.


३. श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे.  मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

४. कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी )-
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

बर्‍याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी मंदिरात २० पुजारी आहेत. दर शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा