मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

४. श्रीक्षेत्र शिंगणवाडी -
चाफळपासून अर्धा ते एक कि. मी. अंतरावर नैऋत्य दिशेस शिंगणवाडी ही टेकडी आहे. या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी जप, ध्यान-धारणा करीत असत. म्हणून आपल्या दैवताची-मारुतीची मूर्ती त्यांनी तेथे शके १५७१ मध्ये स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शिंगणवाडीच्या मारुतीस ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब-रुंद असणार्‍या गाभार्‍यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा आल्हाददायक व पवित्र वातावरणाचा आहे.

मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे. मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते. चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात.

चाफळच्या श्रीराम देवस्थानकडून या मंदिराची पूजा केली जाते. चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत. ‘रामघळ’ हे समर्थांच्या साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे.
५. श्रीक्षेत्र उंब्रज -
मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्‍या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. या मूर्तीची उंची सुमारे ६ फुट असून मूर्ती आकर्षक आहे. मूर्ती चुना, वाळू व ताग या तिन्हीच्या मिश्रणातून बनवलेली आहे. मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. या मारुतीला ‘उंब्रजचा मारुती’ किंवा ‘मठातील मारुती’ असेही म्हणतात. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला कळस नाही.उंब्रजच्या मारुतीची स्थापना शके १५७१ मध्ये केली गेली.

‘विश्रामधाम’ या ग्रंथातील उल्लेखानुसार या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थ रामदास स्वामींनी येथे सलग १३ दिवस कीर्तन केले. या मूर्तीच्या स्थापनेसंबंधी असेही म्हटले जाते की, चाफळहून समर्थ उंब्रजला स्नान करण्यासाठी येत असत, म्हणून या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. परिसर अतिशय पवित्र व मंगलमय आहे. चैत्र शुद्ध १५ ला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. हनुमान जयंतीच्या १ दिवस आधी इथे ‘सांप्रदायिक भिक्षेचा’ कार्यक्रम होतो.
६. श्रीक्षेत्र माजगाव
चाफळहून माजगांव हे सुमारे २ कि. मी. अंतरावर आहे. माजगावच्या मारुतीची उंची ५ फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे. चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे.

या मूर्तीच्या स्थापनेसंदर्भात असे म्हटले जाते की, या गावाच्या वेशीवरील एका दगडाला लोक मारुती समजत. समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी इच्छा गावातील लोकांची होती. त्याप्रमाणे समर्थांनी स्वत: त्या दगडावर सुंदर मूर्तीकाम करून मारुतीची मूर्ती घडवली. शके १५७१ मध्ये या मारुतीची स्थापना करून तेथे एक देऊळही बांधले.

मूळ मंदिर आठ फूट लांबी-रुंदीचे असून ते कौलारू आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडे या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम आहे. सध्याचे मंदिर हे श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते.

यात्रेकरूंसाठी या मंदिराच्या जवळपास म्हणावी अशी खास सोय नाही. परंतु मंदिराच्या समोर असलेल्या सभामंडपात निवासाची सोय होऊ शकते.
७. श्रीक्षेत्र बहे - बोरगाव
कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे - बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. इथली मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहात ‘रामलिंग’ नावाचे एक प्राचीन बेट आहे. या बेटावर राममंदिर आहे. या राममंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके १५७३ मध्ये समर्थांनी केलेली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे.

रावणवध करून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करीत असताना सुचले असेही म्हटले जाते. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी निसर्गसृष्टीने बहरलेला व अगदी रम्य असा इथला परिसर आहे. मारुती मंदिराबरोबरच या कृष्णा नदीत अनेक लहान-लहान बेटे व अनेक समाधी इथे आहेत. कृष्ण-माहात्म्यात ‘बाहुक्षेत्र’ असा या स्थानाचा उल्लेख आढळतो. या बेटापासून ‘मच्छिंद्र’ गड जवळच आहे.
८. श्रीक्षेत्र मनपाडळे
समर्थस्थापित अकरा मारुतीपैकी मनपाडळे हा एक. नदीच्या काठी वसलेले हे मारुती मंदिर कौलारू आहे. मंदिराचा गाभारा ७ x ६ चौ. फूट असून याच्याभोवती २६ x १५ चौ. फुटांचा भव्य सभामंडप आहे. मूर्ती प्रसन्न असून नवसाला पावणारी आहे असे मानतात. मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती सुमारे ५ फूट उंचीची असून मूर्तीजवळ कुबडी आहे.

ज्योतिबाचा डोंगर व पन्हाळगड ही ठिकाणे येथून अगदी जवळच्याच अंतरावर आहेत. अशा या पवित्र व रम्य परिसरात ह्या मूर्तीची स्थापना समर्थांनी शके १५७३ साली केली.
९. श्रीक्षेत्र पारगाव -
मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर पारगाव हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.

या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती असे समजले जाते.

पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे स्वराज्याविषयी  चर्चेसाठी या गावी येत असत. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत.
१०. क्षेत्र शिराळे
समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा एक महत्त्वपूर्ण मारुती होय. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा मारुती ओळखला जातो. येथील मंदिर व मूर्ती ही उत्तरभिमुख आहे. या मारुतीला ‘वीरमारुती’ म्हणतात. मूर्तीची उंची सुमारे ७ फूट आहे. मूर्ती ही सुबक व रेखीव कोरलेली आहे. मूर्तीच्या डोक्यावरील झरोक्यांतून सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर प्रकाश पडतो. हे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

मंदिरासमोर प्रशस्त असा सभामंडप आहे. अकरा मारुतींच्या देवळात हे मंदिर सर्वात सुंदर आहे असे भाविक म्हणतात. समर्थांनी मंदिराची स्थापना १५७६ मध्ये केली. मूर्ती स्थापनेनंतर समर्थशिष्य जयरामस्वामी यांनी कौलारू मंदिर बांधले. पुढील काळात एका भक्ताने दगडी मंदिर बांधून मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिराळे हे गाव गारूड्यांच्या व नागांच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मंदिर गावाच्या मध्यभागी असून बसस्थानकापासून जवळच आहे. हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा